उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन
परभणी /प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
मानवत :शहरातील प्रभाग क्रमांक २, ५ आणि ८ यांना जोडणाऱ्या ‘मर्कज मस्जिद ते मरीआई मंदिर’ या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शहरातील प्रलंबित विकासकामांना पुन्हा गती मिळाल्याचे या निमित्ताने दिसून आले असून हा रस्ता केवळ नागरी दळणवळणासाठीच नव्हे तर शहरालगतच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मानवत शहरातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या कामाकडे नागरिकांसह शेतकरी वर्गाचे विशेष लक्ष लागले होते.
या प्रसंगी डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले की, मागील काळात शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली होती; मात्र हा रस्ता काही कारणांमुळे प्रलंबित राहिला होता. नागरिकांना दिलेला शब्द पाळत आवश्यक निधी उपलब्ध करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. लवकरच दर्जेदार पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात येईल आणि तिन्ही प्रभागांबरोबरच शेतकऱ्यांची वाहतूकही अधिक सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. लाड म्हणाले की, हा मार्ग शहरातील अनेक नागरिकांसाठी दैनंदिन वापराचा असून सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरून होते. विशेषतः शेतकरी आपल्या शेतीमालाच्या ने-आणीसाठी, कृषी अवजारे नेण्यासाठी आणि शेतात जाण्या-येण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्ता सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक होते. “काम करत आलोय, काम करत राहू” या भूमिकेतून मानवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
रस्ता कामाच्या शुभारंभावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. लाड यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले .
यावेळी बाळासाहेब मोरे, अभिषेक आळसपुरे, दत्तराव चौधरी, नियामत खान, सय्यद जमील , रहीम बागवान, किशोर लाड , मुन्सर बेलदार राजुभाऊ सोरेकर, गणेश दहे, अजिजभाई बागवान, बशीर बेलदार, यूनुस बागलानी, सुलेमान बागवान, मसूद अन्सारी, सद्दाम खान आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.










