चिखली | प्रतिनिधी :
मुसळधार पावसामुळे चिखली परिसरातील पाटील नगर व डिफेन्स कॉलनी येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिस्थितीची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विकासभाऊ साने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या.
पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून, त्यांच्या तात्पुरत्या निवासासाठी महानगरपालिका शाळा, चिखली येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाण्याने भरलेल्या भागात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिका व आपत्कालीन यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केले आहे.










