मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखा, उपविभागीय वणी यांच्या पथकाने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई केली.
आठवडी बाजारासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दुचाकी व इतर वाहनांनी मारेगावात येत असतात. यापैकी काही वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी वाहनचालकांना मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. विशेषतः आठवडी बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी असल्याने अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशाराही दिला.
वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहनही जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.









