सुशांत मोरे यांच्या उपोषणाची दखल; प्रशासनाकडून सर्वेक्षण पूर्ण, सुधारित आराखड्याचे काम सुरू
सातारा : प्रतिनिधी – मेढा-महाबळेश्वर मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाने मागणीची दखल घेत रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण केले असून सुधारित आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
केळघर घाटातील काळा कडा ते महाबळेश्वर या मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळणे, माती-दगड रस्त्यावर येणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडतात. दरवर्षी तात्पुरती डागडुजी केली जात असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने समस्या कायम आहे.
मेढा-महाबळेश्वर हा पर्यटन व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने कायमस्वरूपी दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी रुंदीकरण तसेच दरडींच्या समस्येवर शास्त्रीय उपाययोजना करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे. वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागामध्ये समन्वय साधून अडथळे दूर करण्याची मागणीही त्यांनी केली.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मोरे यांनी केली. तसेच अधीक्षक अभियंता सातपुते, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आणि सहायक कार्यकारी अभियंता निलेश कोहळे यांचे त्यांनी आभार मानले.











