सेलू, जि. परभणी | प्रतिनिधी : झोडगाव येथे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
ग्रामपंचायत अधिकारी समंदर शेख, ग्राम महसूल अधिकारी आत्माराम मुलगीर आणि कृषी सहाय्यक अधिकारी दीपक बदाने यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांना दिली.
सोयाबीन व कापूस पिकांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले असून उत्पादन हातातून गेले असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
नुकसानीची पाहणी पारदर्शक पद्धतीने करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.










