२२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय, वाळूज पोलिसांचा तपास सुरू
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिसगाव-वडगाव रस्त्यावरील संविधान चौकात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात मकरंद संजय जाधव (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरंद जाधव दुचाकीवरून प्रवास करत असताना त्याचा अपघात झाला. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली सिमेंटची सुरक्षा भिंतही जोरदार धडकेमुळे तुटली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील मकरंदला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, हा अपघात नसून घातपात असण्याचा संशय मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या घटनेचे नेमके कारण काय, अपघात नेमका कसा घडला आणि यामागे अन्य कोणती बाब आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वाळूज पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून, तपासाअंती अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.










