सावर्डे विद्यालयाच्या ग्रंथालयात विश्वकोश प्रदर्शन; दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीला चालना
सावर्डे (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूर्ण वाचनाची सवय, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे ‘शोध शब्दांचा, वेध ज्ञानाचा : विश्वकोश’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या ग्रंथालयात विविध विश्वकोश ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
उपक्रमाचे उद्घाटन पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. दहावीच्या मराठी व इतिहास विषयातील ज्ञानकोश आणि विश्वकोश या संकल्पनांना प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यात आली. विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाचे विविध खंड, डिजिटल विश्वकोश तसेच विविध विषयांवरील नोंदी कशा शोधाव्यात, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
विज्ञान, कला, साहित्य, इतिहास, भूगोल आणि भाषा अशा विविध ज्ञानशाखांतील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. त्यामुळे पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळविण्याबरोबरच शब्दसंपदा, आकलनशक्ती आणि स्व-अध्ययनाची सवय विकसित होण्यास मदत झाली. दहावीच्या बोर्ड परीक्षेतील स्थूलवाचन व इतिहास विषयातील कोशवाङ्मय घटकाच्या तयारीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरला.
‘विश्वकोश हा केवळ माहितीचा संग्रह नसून विद्यार्थ्यांना स्वतःहून ज्ञान शोधण्याची दिशा देणारे प्रभावी साधन आहे,’ असे मत उपक्रमाच्या समन्वयक शिक्षकांनी व्यक्त केले.
उपक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी विश्वकोशाच्या आधारे तयार केलेले तक्ते, माहिती संकलन व प्रकल्प अहवालांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथपाल सौ अनुष्का काजरोळकर सौ. अपर्णा डिके, सौ. श्रद्धा सावर्डेकर व सौ. नेहा मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी उपक्रमाचे कौतुक केले.








