लासलगांव, दि. 07 (श्री. गणेश ठाकरे ) :- खरीप हंगामातील मका, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, बाजरी व करडई काढणीचे काम सुरू झाले असुन शेतकरी बांधवांचा सदर शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारावर विक्रीस येत असल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणुन लासलगांव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे सन 2026-27 या हंगामाकरीता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे या संस्थेमार्फत सन 1990-91 पासुन राबविण्यात येणा-या या योजनेंतर्गत बाजार समिती सन 2026-27 या हंगामाकरीता मका, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतक-यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरित्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी व करडई हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणुन ठेवला जाईल. त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभुत दर यापैकी जे कमी असेल ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतुन संबंधित शेतक-यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे. संबंधित शेतक-यांचा खाते उतारा व 7/12 उता-यावरील लागवड क्षेत्र व उत्पादीत माल याचे प्रमाण ठरवुन एकुण किंमतीच्या 75 टक्के रक्कम तारण कर्ज म्हणुन 06 महिन्यांचे मुदतीने 06 टक्के व्याजदराने शेतक-यांना अदा करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या 06 महिन्यांकरीता 08 टक्के व त्यापुढील 06 महिन्यांकरीता 12 टक्के व्याज दराने आकारणी केली जाणार आहे. 18 महिन्यांनंतर सदर कर्जास मुदतवाढ मिळणार नाही.
तरी शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयात अथवा 9921423536 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप, उपसभापती संदीप (ललीत) दरेकर व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.









