

जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिकस्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन बुद्धगया येथे सुरु आहे.या आंदोलनास ऑल इंडिया पँथर सेनेचा जाहीर पाठिंबा व समर्थन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून आज संग्रामपूर तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुजित बांगर यांनी म्हटलें आहे की
महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बुद्धगया मंदिर कायदा १९४९ हा कायदा आहे. या कायद्या अंतर्गत ब्राम्हणांनी बुद्ध विरासत महाबोधी महाविहारावर कब्जा करून ठेवला आहे.
या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला मंदिर म्हणून उल्लेखित करण्यात आले आहे. या कायद्यात अशी तरतूद आहे कि महाबोधी महाविहाराला संपूर्ण व्यवस्थापन पाहण्यासाठी,प्रत्येक निर्णय घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती असेल. या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य हिंदू असतील व चार सदस्य बौद्ध असतील. या नऊ सदस्यीय समितीमध्ये एक सदस्य गया जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी असतील व तेच या समितीचा अध्यक्ष सुद्धा असतील. त्यापुढे जाऊन हा कायदा म्हणतो की, जर गया जिल्ह्याचे दंडाधिकारी हे गैरहिंदू असतील तर ते या समितीचा अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. सरकार एकूण सदस्यापैकी,अध्यक्ष म्हणून हिंदूचीच निवड करेल. त्यानंतर या कायद्यानुसार समितीची बैठक घेण्यासाठी,विहाराबाबत कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी कमीतकमी ४ सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. समितीवर ५ सदस्य हिंदूच असतात. म्हणजे, उरलेले ४ बौद्ध सदस्य नसले तरी विहाराबाबतचा प्रत्येक निर्णय घेतला जातो.
हे आहे सर्वात मोठे कारण !
म्हणून,जर आम्हाला महाबोधी महाविहाराचा ताबा मिळवायचा असेल तर, सर्वात पहिल्यांदा हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी, आपल्याला आवाज उठवावा लागेल. वेळप्रसंगी रस्त्यावरची आंदोलनं देखील करावे लागतील.
बुद्धगया मंदिर कायदा (बी टी ॲक्ट १९४९) लवकरात लवकर रद्द झाला पाहिजे अशी मागणी यावेळी सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय भाई वानखडे बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे, सुजित बांगर, पंकज शेगोकार, सुनिल गव्हांदे,आकाश तायडे, आनंद हेरोडे, विजय ठाकरे अमोल पाटील,मंगेश पाटील, यांचेसह परिसरातील अनेक संघटनांचे पदाधिकारी या एक दिवसीय धरणे आंदोलनास उपस्थित होते..
Discussion about this post